पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे.रुग्णालयाने स्वतःचीच समिती तयार करुन अहवाल सादर केला. मात्र यामध्ये त्यांनी मृत रुग्णांची वैयक्तिक माहिती जाहीर केली. यावरुन आता राज्य महिला आयोग आक्रमक झाला असून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
या प्रकरणी महिला आयोगाने पुणे पोलीस व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र लिहिले आहे. गर्भवती महिला मृत्यूप्रकरणात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्ण महिलेची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश महिला आयोगाने या पत्रात दिले आहेत. दरम्यान याआधी महिला आयोगाला भिसे कुटूंबियांकडून पत्र लिहिण्यात आले होते. यानंतर राज्य महिला आयोगाने तातडीने एक्शन घेत पुणे पोलिसांनी कारवाईबाबत पत्र लिहिले आहे.आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील दौरा करुन प्रशासकीय भेटी घेतल्या आहेत. तसेच कडक कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
तनिषा भिसे या रुग्णालयात प्रस्तुसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे डिपॉझिट म्हणून तब्बल दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती.कुटुंबाने अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दर्शवली होती मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात न आल्याने वेळेत उपचार मिळू शकला नाही आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियाकडून करण्यात आला आहे.