हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) सौरभ सुदाम काकडे यांनी लग्नाला होणारा अवास्तव खर्च टाळून राज्यातील गोरगरीब रुग्णांना मदत करणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाला ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुर्पुर्त करून पूर्व हवेलीसह परिसरात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
थेऊर येथील सौरभ सुदाम काकडे व आष्टापूर येथील काजल पंढरीनाथ कोतवाल यांचा शुभविवाह रविवारी (ता. २७) रोजी पार पडला. यावेळी त्यांनी आपणसुद्धा समाजाचे देणे लागत असल्याची जाणीव उभय वधू-वर पक्षाला झाल्याने विवाहातील अनावश्यक खर्च टाळून त्याचा उपयोग समाजासाठी व महाराष्ट्रात उद्भवत असलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देण्याची कल्पना मांडली गेली. त्यानुसार सदरचा धनादेश मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, बंदरे विकासमंत्री दादासाहेब भुसे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी राज्यपाल डी वाय पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर, झी 24 तासचे संपादक निलेश खरे, News 18 लोकमतचे पत्रकार विलास बढे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राज्यातील प्रमुख रुग्णालयांचे MD, डॉक्टर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आयुष्यात लग्न हि एकमेव गोष्ट आहे ती एकदाच होते. त्या लग्नाचा डामडौल काही वेगळाच असतो. मोठे लग्न व्हावे तसेच मोठ्या लोकांनी आपल्या लग्नाला यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग लग्नाला कितीही खर्च झाला तरी चालेल, मात्र हा होणारा खर्च न करता जो खर्च येणार आहे तो चांगल्या कामासाठी उपयोगात आणणारे बोटावर मोजण्या इतकेच असतात. त्यामुळे काकडे व कोतवाल परिवाराने पूर्व हवेलीसह परिसरात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.