धुळे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल 26 एकर जमीन हडपली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. आता धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबांना याप्रकरणी मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने माजी राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश रावल कुटुंबीयांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी या जमिनीप्रकरणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोडले नसून इतर कुटुंबियाचं काय?असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणानंतर शिंदखेडातील गरिबांना न्याय कोण देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा आरोप धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान जयकुमार रावल यांनी 2004 2009,2014,2019 आणि 2024 सलग पाच वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. या निवडणुकीनंतर आता जयकुमार रावल यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली असताना जमिनीबाबत गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.