dhule crime : धुळे : धुळे शहरातील फिरदोन नगरात मामा भाच्याच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली आहे. मोठ्याने रडत असलेल्या चार वर्षाच्या बालकाला त्याच्या मामाने पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवून मारण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. नुरुल अहमदचे असे नराधम मामाचे नाव आहे. तर मोहम्मद असे त्या निष्पाप मृत बालकाचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी शहरातील फिरदोस नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. मोहम्मद हा रडू लागल्याने नुरुल अहमदचे डोके दुखू लागले होते. यामुळे त्याने संतापात मोहम्मद यास पाण्यात टाकले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे फिरदोस नगर परिसरात मृत बालकाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून संशयित नुरुलबद्दल संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी धुळ्यातील फिरदोस नगरमधील बाळाची आई मरियमबी हुसेन (२८) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मरियमबी हुसेन या त्यांच्या आई-वडिलांकडे गेलेल्या असताना त्यांचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद हा घरात खेळत होता. खेळतांना तो मोठ्याने रडू लागल्याने त्याचा मामा नुरुल अमीन नईम अहमद (२२) याने मोहम्मद यास पाण्याने भरलेल्या पिंपात टाकले. यामुळे मोहम्मदचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.