सोलापूर: “निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो” असा दावा आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे. उत्तमराव जानकर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून आमदार आहेत. “स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहेत,हे देशाला घातक आहे, सरकार ज्या बेछूटपद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील लोकशाहीस घातक आहे” असं उत्तमराव जानकर म्हणाले आहेत. या देशात निवडणूक आयोग हा भाजपसाठी “वाल्या ” म्हणूनच काम करत असल्याचा गंभीर आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे.
ईव्हीएम संदर्भात मुंबई येथे बैठक घेणार
“कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठे उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठे हे चित्र ज्यांनी कोणी उभा केले असेल त्यांना सहजा सहजी सोडलं जाणार नाही.आज जरी तुमच्या हातात सत्ता असली तरीसुद्धा कुठेतरी कृष्ण जन्माला येतो” असे म्हणत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. लवकरच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जाणार असल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले आहेत. येत्या 15 जानेवारीला सर्वपक्षीय 288 पराभूत उमेदवारांबरोबर ईव्हीएम संदर्भात मुंबई येथे बैठक घेणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलं आहे.
सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू
“धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याची जहरी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता. गृहखातं जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे” असा आरोप जानकर यांनी केला आहे. “ वाल्मिक कराड सरकारसोबत तडजोड करूनच पोलिसांना शरण गेला आहे. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे” असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता उत्तमराव जानकर यांनी धनजंय मुंडे यांच्या संदर्भात जळजळीत टीका करून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.