Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी राज्यातील बडे नेते आणि मंत्र्यांच्या गाड्यांमध्ये मोबाईल लपवले आहेत, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढंच नाही तर काही नेत्यांना भेटवस्तू म्हणून दिलेल्या फोटोंमध्ये गुप्त कॅमेरे बसवले होते, असा धक्कादायक दावा देखील जरांगे यांनी केला. या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, धनंजय मुंडेंनी या सर्व आरोपांवर पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी या आरोपांची मालिका उघड केली. त्यांनी काही मंत्र्यांची आणि बड्या नेत्यांची नावं घेत, धनंजय मुंडेंकडून राज्यातील उच्चपदस्थांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचा दावा केला. मात्र, दुपारी धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत या सर्व दाव्यांचा इन्कार केला आणि हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं सांगितलं.
मुंडे म्हणाले की, “मनोज जरांगे हे मला ऑन एअर संपवण्याची धमकी देत आहेत. यांच्यावर कायद्याने कारवाई का केली जात नाही? माझं जीवन गरीबांच्या उन्नतीसाठी आहे. माझ्या जीवनाचं काही झालं तरी फरक पडत नाही.” ते पुढे म्हणाले की, “कुणाच्या गाड्यांमध्ये मोबाईल लपवणं, लोकेशन ट्रेस करणं हे मी का करू? माझ्याकडे मोबाईलची फॅक्टरी आहे का? लोकांच्या गाड्यांमध्ये मोबाईल टाकायला माझ्याकडे एवढे फोन आहेत का?”

मुंडेंनी जरांगे यांच्या आरोपांना राजकीय हेतू असल्याचं सूचित केलं आणि म्हटलं की, “माझ्याविरोधात कट रचला जातोय. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मी मागणी करणार आहे. गरज पडल्यास मी कोर्टातही जाणार.”
जरांगे यांनी काही मंत्र्यांच्या अंगरक्षकांना धनंजय मुंडेंकडून पैसे मिळतात, असा आरोपही केला होता. या दाव्यावर मुंडेंनी कोणतंही उत्तर दिलं नाही. तथापि, या आरोप-प्रत्यारोपांमुळे जरांगे आणि मुंडे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणात राज्यातील राजकारण तापलं आहे.







