मुंबई : शासकीय खरेदी केंद्रावर धान-भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिली.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान-भरड धान्य खरेदी केली जाते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकरी नोंदणीकरिता ३१ डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत होती. मात्र, अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासन वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीचा विचार करून आता ही मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून त्यात शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.