राजु देवडे
लोणी धामणी : धामणी (ता.आंबेगाव) रंगनाथ जाधव व शांताराम जाधव या दोन तरूणांनी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल व डोक्यावरील केस व दाढी न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणसंदर्भातील आंदोलनाला भरघोस पाठिंबा मिळाला आहे. आंबेगाव तालुक्यात देखील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.
धामणी येथील दोन सख्खे मावस बंधू रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव या दोन बंधूंनी अनोखे आंदोलन करून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गेली तीन महिने रंगनाथ जाधव यांनी चप्पलचा त्याग केला असून, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण त्यांनी केला आहे. तर त्यांचे मावसभाऊ शांताराम जाधव यांनी देखील गेली चार महिन्यांपासून दाढी, डोक्याचे केस न काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत धाडी डोक्याचे केस काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाला लोक पाठिंबा देत आहेत.
धामणी येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या साखळी उपोषणात देखील यांचा सक्रिय सहभाग होता. आजही त्यांनी आपला शब्द राखला असून, जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर हा त्याग कायम असेल असे त्यांनी सांगितले.
धामणी शिरदाळे पहाडदरा सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जे आंदोलन केले. त्यात या बांधवांचा मोठा सहभाग होता. शिवाय साखळी उपोषणाच्या वेळी देखील यांनी आमरण एकदिवसीय उपोषण केले होते. तर जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटलांच्या सभेला आवर्जून उपस्थित असतात, असे मराठा आंदोलक मयुर सरडे यांनी सांगितले.