आंध्र प्रदेश: तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर बुधवारी दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तिरुपतीमधील विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ ही घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून दुःख व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.
टोकन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा
तिरुपती मंदिराच्या वैकुंठ गेटवर दर्शनासाठीचे टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानने 9 डिसेंबरपासून दर्शनासाठी टोकन व्यवस्था सुरू केली आहे. तिरुपती मंदिराच्या 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते टोकन घेण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
या चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिरुपती देवस्थान समितीने 10,11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता.