नागपूर : सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासोबत आज सोलापूरचे काँग्रेस नेते देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरात भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी देवेंद्र कोठे यांनी भाजप प्रवेशावर बोलताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मी पालकत्व स्वीकारत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मला सांगितले.यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निकाल हा भाजपच्या बाजूने असेल, असाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.भाजपची ध्येय धोरणे आवडल्यामुळे आपण पक्ष प्रवेश केला आहे. आता भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे कोठे यांनी यावेळी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात माजी महापौर महेश कोठे सक्रिय आहेत. त्यांचे पुतणे देवेंद्र यांनी मात्र वेगळा मार्ग स्वीकारला आहे. देवेंद्र कोठे हे माजी नगरसेवक आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. नागपूरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यावेळी भाजपचे सोलापूर लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख,शहराध्यक्ष नरेंद्र काळे,माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते.