मुंबई : नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. त्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. अखेरीस ब-याच चर्चा आणि वाटाघाटीनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
अमित शाह एकनाथ शिंदेंना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असं अमित शाह यांनी यावेळी बैठकीत सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी याबाबत अजुनही निर्णय कळवला नाही, अशी सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.
महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रा्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून संविधान समोर ठेवून हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला असला तरी इतर महत्त्वाच्या खात्यावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याच दिसत आहे.