बापू मुळीक / सासवड : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे बळकटीकरण व्हावे आणि कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र व राज्य शासन आणि नाबार्डच्या वतीने विकास सोसायट्या संगणकीकृत करण्यात येत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १ हजार १९२ सोसायट्या घेण्यात आल्या असून पुरंदर तालुक्यातील सर्व सोसायट्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी बुधवारी (दि. १८) सासवड येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयात सर्व सोसायट्यांचे सचिव आणि बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुचना दिल्या.
याप्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर श्रीकांत श्रीखंडे, बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे, वसुली अधिकारी किरण जाधव, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, जिल्हा केडरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णा थोरात, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी व या योजनेचे मुख्य प्रशिक्षक जयेश गद्रे उपस्थित होते.
संगणकीकरणामुळे सभासदांना संस्थेची संपूर्ण माहिती एका क्षणात मिळणार आहे. यामुळे व्यवहार आणखीन पारदर्शी होणार असून शेतकरी सभासदांना कर्जासंदर्भातील माहिती तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज, पीक, उत्पन्न, अनुदाने याबाबतचा संस्थेतील खात्याचा तपशील केंद्र व राज्य सरकारला धोरण ठरविताना आणि निर्णय घेताना तातडीने उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात ९५ आणि निंबुत ( ता. बारामती) येथील २ अशा एकूण ९७ सोसायट्यांचा समावेश आहे. यापैकी २७ सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून ३१ डिसेंबर अखेर ३३ सोसायट्यांचे तर उर्वरित ३७ सोसायट्यांचे संगणकिकरण १५ जानेवारी अखेर पुर्ण होणार असल्याचे जयेश गद्रे यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत शासनाकडून सोसायटीस संगणक, प्रिंटर, साॅफ्टवेअर, इंटरनेटची सुविधा आदी साहित्य पुरविण्यात आल्याचेही गद्रे म्हणाले. याप्रसंगी जिल्हा केडरचे भरत धुमाळ, बँकेचे विकास अधिकारी शरद वणवे यांसह सर्व सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते.