पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे नाशिकमधील 10ते 12 नगरसेवक फोडले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.मात्र याच नगरसेवकांनी थेट ‘मातोश्री’वर धाव घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ फेल झाले असल्याची चर्चा होत आहे.

ठाकरेंच्या नाशिकच्या नगरसेवकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे .शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यातील 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला होता. पक्षांतर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची मोठी ऑफर देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगरसेवकांनी थेट ‘मातोश्री’वर धाव घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना एकनिष्ठतेचे वचन दिले आहे.ते म्हणाले,ज्याप्रमाणे नाशिकचे खासदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले, तसेच आम्ही सर्व 15 नगरसेवकही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहू. आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. आम्ही स्वतःहून उद्धवजींची वेळ मागितली होती आणि आज त्यांना भेटून एकनिष्ठतेचे वचन दिले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या आजच्या तातडीच्या बैठकीला नाशिकचे सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते. एकही नगरसेवक गैरहजर नसल्याने शिंदे गटाचा नाशिकमधील नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न फसला असल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी गटाकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवली जात असली, तरी नाशिकमध्ये ठाकरे गटाची वज्रमूठ कायम असल्याचे या बैठकीवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकमध्ये तरी पूर्णपणे अपयशी ठरल्याची चर्चा आता रंगली आहे.







