खेड : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील दोन मुलींच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची व्यक्तिगत आर्थिक मदत दिली आहे. रोख स्वरूपातील मदत शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. २८) मुलीच्या आई – वडिलांकडे सुपूर्त केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, सागर काजळे, हरेश देखणे, तहसीलदार ज्योती देवरे तसेच पीडित मुलींच्या कुटुंबातील सदस्य, विविध जिल्ह्यांतून आलेले भटक्या विमुक्त समाजाचे नेते, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
राजगुरुनगर येथील घटनेचा राज्यभरातून निषेध होत आहे. या संतापजनक प्रकारामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बंद पाळून मोर्चे काढले जात आहेत. दुसऱ्या बाजूला हतबल असलेल्या या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत. या कुटुंबाला स्वतःचे घर नाही. भाड्याचे घर आहे तिथे घटना घडल्यामुळे तेथे जाण्याची मानसिकता नाही.
अशा स्थितीत हे कुटुंब थिगळे स्थळ येथील नातेवाइकांकडे तात्पुरते थांबले आहे. शासकीय मदतीसाठी काही अवधी जाणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने रोख पाच लाख रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी या परिवाराला दिली. शिवाय शासकीय जागा व घरकुल देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजगुरुनगरमध्ये कडकडीत बंद
माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (दि. २८) राजगुरुनगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृतीशिल्पांना अभिवादन करून निषेध मोर्चा काढण्यात आला. जुने मोटार स्टैंड, शनि मंदिर चौक, बाजार पेठ मार्गे हा मोर्चा काढण्यात आला. सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती. “आरोपीला फाशीची शिक्षा द्या” असा आक्रोश करीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.