सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या अफझल खानाच्या कबरी समोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभाग या दोन्ही विभागाने या संयुक्त कारवाईचे नियोजन केले आहे. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात येत असल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कबरी समोरील अनाधिकृत बांधकामामुळे यापुर्वी अनेकदा वाद झाले आहेत. हिंदुत्ववादी संघटना व शिवप्रेमी यांनी अनेकदा हे वाद सामान्य नागरिकांसमोर प्रयत्न केला आहे. इतिहास चुकीचा सांगण्यावरून अनेकदा वाद घडले असून हे बांधकाम तातडीने पाडावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत होती. या धरतीवर हा परिसर सन २००६ पासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल इतिहास सर्वाना प्रेरणादायी असून तो नागरिकांना अनुभवता यावा यासाठी हा सर्व परिसर खुला करावा, अशी मागणी सातत्याने शिवप्रेमी करत होते. परंतु हा वाद न्यायालयात असल्याने यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. त्यानंतर न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश आल्यानंतर देखील कारवाई होत नव्हती. आज अखेर महसूल व वन विभागाने पहाटे ५.३० वाजल्यापासून अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. यावेळी या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हा परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती आहे.
१० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत शासकीय यंत्रणेने कामाला सुरुवात केली आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाला संपवला होता, त्यामुळे आजच्याच दिवशी शासकीय यंत्रणांनी मोहिमेला सुरुवात केल्याने शिवभक्तांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिवप्रताप दिनाचा दिवशी अनेक शिवभक्त गडावर पाया पाडण्यासाठी येत असत, मात्र आज कारवाईमुळे सर्व परिसर सील करण्यात आला आहे.