लोणी काळभोर : भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून लोकशाहीचा आत्मा आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसचे प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मुल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित आहेत, असे प्रतिपदान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे प्रवीण काळभोर यांनी केले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. 26) संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळीप्रतिप प्रवीण काळभोर बोलत होते.
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, भाजपचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर, राष्ट्रीय स्वयंम संघाचे विशाल वेदपाठक, दिनेश कांबळे, विनायक कांबळे, संजय भालेराव, अजित भालेराव, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस हवालदार रामदास मेमाणे, गणेश सातपुते, रामहरी वणवे, चक्रधर शिरगिरे, समाधान गायकवाड, प्रल्हाद कांबळे, दिनेश घाडगे व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण काळभोर म्हणाले, “देशाचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची सर्वांना माहिती व्हावी यादृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापणा करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आला आहे.”
यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट म्हणाले की, परकीय आक्रमण असो अथवा देशातील कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असो. ते रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. पोलिसांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये घुसून अतिरेकांचा खात्मा केला होता. या हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीर मरण आले होते. वीर गती प्राप्त झालेल्या सर्व जवानांना अभिवादन करतो. तसेच कायदा हा संविधानावर चालत आहे. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहे. त्यामुळे आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानातील मूल्य व तत्वांचे जतन करण्यासाठी कटिबध्द राहू या. असे आवाहन यावेळी राजेंद्र करणकोट यांनी केले आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले अधिकार व संविधानाची जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेने दिलेली उपदेशिकेचे पठण करण्यात आले. यावेळी संविधानबाबत घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन अमोल टेकाळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.