नवी दिल्ली: ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) महिलांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘महिला सम्मान योजना’ गुरुवारी लागू केली. त्यानुसार महिलांना दरमहा १००० रुपये देण्यात येणार आहेत. १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिला या योजनेस पात्र असणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महिला सम्मान निधी १००० वरून २१०० रुपये करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेत महिला सम्मान योजना लागू केल्याची घोषणा केली. यावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महिला सम्मान योजनेवर मोहोर उमटवण्यात आली. याअंतर्गत दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला १००० रुपये दिले जातील.
या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया आज (दि. १३) शुक्रवारपासून सुरू झाली. १८ हून अधिक वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. लाभार्थी बनण्यासाठी महिलेकडे दिल्लीतील मतदान कार्ड-असणे आवश्यक आहे. मात्र, आयकर भरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी फेब्रुवारी महिन्यात ‘दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर १००० रुपयांचा निधी वाढवून २१०० रुपये करण्यात येणार आहे.
सध्या गगनाला भिडलेली महागाई आणि महिलांची मागणी लक्षात घेता ही रक्कम २१०० करणार असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले. आता निवडणूक तोंडावर आहे. पण, निवडणुकीनंतर १००० नव्हे, तर २१०० रुपये देऊ, असे वचन केजरीवालांनी दिले. दिल्लीतील महिलांनी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावावी. ७० पैकी ६० पेक्षा अधिक जागांवर आपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन केजरीवालांनी केले. दरम्यान, दिल्ली सरकारने गेल्या मार्च महिन्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात महिला सम्मान योजना जाहीर केली होती. यात महिलांना १ हजार रुपये दरमहा देण्याची ठळक तरतूद आहे. आता निवडणुकीनंतर हाच निधी २१०० रुपये करण्यात येणार आहे.