दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बीगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर निकाल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिल्ली विधानसभेसाठी ११ जिल्ह्यात ७० जागांसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत १.५५ कोटी मतदार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यासाठी अर्ज दाखल तारीख १० जानेवारी २०२५ आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १७ जानेवारी पर्यंत असणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० जानेवारीपर्यंत असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल तर निकाल ८ फेब्रुवारीला लागणार आहे.
निवडणूक आयोगाकडून आरोपांना उत्तर..
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांनाही उत्तरे दिली आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असते हे सांगताना राजीव कुमार म्हणाले की, देशात साडे दहा लाख बूथ आहेत. तिथं ४५ ते ५० लाख पोलिंग अधिकारी हे त्याच राज्यातले आणि वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. ते पहिल्यांदाच भेटलेले असतात, दोन तीन दिवसांपूर्वीची त्यांची ओळख असते. ते घोटाळा करायला एकत्र आलेले नसतात. असं राजीव कुमार यांनी सांगितले.