बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं लग्नाच्या सहा वर्षांनंतर अखेर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिनं आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. कोणत्या महिन्यात बाळाचा जन्म होणार हे देखील त्यांनी सांगितले आहे. दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे.
गेल्या महिन्यात दीपिकाच्या प्रेग्नंसेची बातमी समोर आली होती. मात्र, त्यावर दीपिका-रणवीर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता त्या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गुडन्यूज पोस्ट शेअर केली आहे. दीपिकानं पोस्ट शेअर करताच काही मिनिटांमध्येच लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
काही आठवड्यांपूर्वी एका रिपोर्टमधून दीपिका प्रेग्नंट असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दीपिका बाफ्टा अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. त्यात तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात तिचं बेबी बंप स्पॉट करण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र, त्या चर्चा आता खऱ्या ठरत आहेत.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं 2018 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 6 वर्षानंतर ते आई-वडील होणार आहेत. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला दीपिकानं ‘वोग सिंगापुर’ ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिला आई व्हायचं आहे. रणवीर आणि तिला मुलं फार आवडतात. त्याशिवाय तिनं सांगितलं की ‘मला त्या दिवसाची प्रतिक्षा आहे जेव्हा आम्ही एक कुटुंब सुरु करू.’