पुणे : पुण्यात लाडकी बहिणीच्या नावाने महिलांची फसवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहिणीचे पैसे देत असल्याचे सांगून एका चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व अंगठी असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज हातचलाखीने काढून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसरमधील कर्मवीर भाऊराव पाटील १५ नंबर चौकात २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत हडपसर येथील एका ७० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गुरुवारी सकाळी ११ वाजता स्वस्त धान्य दुकानाचे कुपन घेऊन घरी परत निघाल्या होत्या. यावेळी पेट्रोल पंपाजवळ एक जण त्यांना भेटला व त्याने सांगितले की, चला मावशी येथे एक साहेब लाडकी बहिणीचे पैसे वाटप करत आहेत, असं बोलून तो फिर्यादी महिलेला घेऊन भाऊराव पाटील १५ नंबर चौकात घेऊन आला.
त्या ठिकाणी फिर्यादी यांना तो म्हणाला. येथे ५ हजार रुपये वाटत आहेत, असे सांगून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहून त्या घरी निघून आल्या. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व अंगठी दिसून आली नाही. बोलण्यात गुंतवून चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करीत आहेत.