मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच घाटे यांना वैद्यकीय सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विज्ञानविषयक ललित आणि माहितीपर लेखन करणारे साहित्यिक म्हणून घाटे हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
पुणे येथे वास्तव्यालाअसणारे घाटे हे गेले अनेक महिने आजारी आहेत. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी उपमुख्यमंत्र्यांना घाटे यांच्याविषयी माहिती देताच ताबडतोब पाच लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच शासन म्हणून व वैयक्तिकरीत्याही सोबत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी घाटे यांना दिलासा दिला.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडूनही विचारपूस
घाटे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल समजताच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीदेखील त्यांच्याशी त्वरित संपर्क साधला. याप्रसंगी त्यांनी निरंजन घाटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच शासन आणि मराठी भाषा विभाग सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले.