बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून काही कार्यकर्ते माझ्या सभेमध्ये येतात, मला दिसतात आणि दुस-या सभेला गेले की, त्यांच्याकडेही दिसतात. कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकू लावा. ज्या कार्यकर्त्यांना मी पद दिली, मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना दिला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिर्सुफळ (ता. बारामती) येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सज्जड दम दिला आहे. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची धांदल उडाली आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चार दिवस सासुचे ही म्हण ऐकली आहे मात्र आता चार दिवस सुनेचे येऊ द्या. आता काळ बदलला आहे सासूदेखील सुनेच्या हातात घराचा कारभार देते. सून चुकल्यास तिला बोलते मात्र कारभार देण्याचं काम तरी करते. तसं आता सुनेला मतदान करण्याची गरज आहे. बारामती लोकसभेचा विकास करायचा असेल. तर सुनेत्रा पवारांना मत देणं त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
राज्याचा निधी आपल्याला कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आणणे गरजेचे आहे. कृष्णा नीरा भीमा नदी जोड काम सुरू आहे. कृष्णा खोऱ्याचे पाणी निरा नदीत आणले आहे. आणि मीरा नदीतून ते भीमा नदीत उजनी धरणात सोडले जाणार आहे, या पाण्याचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. मागील खासदाराने काय केलं हे आपल्याला माहिती आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील लोक आपल्या चांगल्या संपर्कातले आहेत. ते शब्द खाली पडू देणार नाही आणि विकास केला तर निधीदेखील देतील, त्यामुळे कोणाला मत द्यायचं हे ठरवण्याचं काम तुमचं आहे.
दरम्यान, लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत अनेकांना भावनिक आवाहन केलं जाईल. मात्र भावनिक आवाहनाचा बळी पडू नका. जिथे विकास दिसेल तिथेच मत द्या. विकासकामे करताना मी टोलवा टोलवीचे उत्तरं देणार नाही. असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.