राहुलकुमार अवचट / यवत : पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृत्तपत्र क्षेत्रात सध्या पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही अशी अवस्था निर्माण झाली असून, ढासळणारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ सावरण्यासाठी पत्रकारांना आता संघर्ष करावा लागणार आहे, असे प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, ”ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे पत्रकारिता तगून राहील, एवढीच आशा राहिली आहे. आगरकर, आचार्य अत्रे यांची खरी पत्रकारिता पुन्हा जिवंत करावी लागेल, तरच पुन्हा लोकशाही उभी राहील. पत्रकारांना सर्वत्र मान मिळतो मात्र धन मिळवण्यासाठी पत्रकारीतेच्या व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करुन उत्पन्न मिळवण्याची धडपड करायला हवी.
आज सकाळी श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुजारी राजेंद्र गाडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे व जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सदस्य पवन साळवे यांच्या वडिल गौतम साळवे यांचे गेल्या दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी संघाचे सचिव राहुलकुमार अवचट, विठ्ठल थोरात, दीपक पवार, आनंदा बारवकर, संतोष जगताप, मिलिंद शेंडगे, अतुल बोराटे, बाळासाहेब मुळीक, शशिकांत रासकर, नेताजी खराडे, मंदिराचे पुजारी दादा गाडेकर, विनायक गाडेकर आदींसह जवळपास ४० हून अधिक पत्रकार उपस्थित होते.