अरुण भोई
Daund News राजेगाव : दौंड तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु, वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, धोक्यात येत असलेला निवारा आदी कारणांमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली आहे. (Daund News)
भरदिवसाही नागरिकांना बिबट्याचे दर्शन…
भिगवण- दौंड रस्त्यावरील राजेगाव (ता. दौंड) परिसरातील एका पोल्ट्री शेजारी बुधवारी (ता.२६) दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्या दिसला. या घटनेची माहिती मिळताच, राजेगावचे पोलीस पाटील महेश लोंढे, वनविभागाचे वनरक्षक निखिल गुंड, वन प्रभारी नाना चव्हाण, राहुल चोपडे व ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, पोल्ट्री शेजारी असलेल्या रानामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले आहे. (Daund News)
गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून खेड, जुन्नर, आंबेगाव दौंड तालुक्यातील नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग, बिबट्या व मानव सहजीवन समजून घेऊनच (बिबट्याचा अधिवास मान्य करून) राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, बिबट्यांची संख्या व त्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. आता भरदिवसाही नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. या प्राण्यांमुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढले आहेत. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. (Daund News)
याबाबत बोलताना राजेगावचे पोलीस पाटील महेश लोंढे म्हणाले कि, शेतात काम करण्यासाठी जाताना शेतकऱ्यांनी हातात घुंगुरकाठी तसेच टॉर्च ठेवा. शक्यतो मोठमोठ्याने बोला, तसेच रेडिओ अथवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा. लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. लहान मुलांनी शाळेत समूहाने जावे. मेंढपाळ व ऊसतोडणी कामगारांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी. (Daund News)
याबाबत बोलताना वनविभागाचे वनरक्षक निखिल गुंड म्हणाले कि, बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेतो. गावाजवळ अस्वच्छता असल्यास गावाजवळ वावरणारी डुकरे, कुत्रे यांच्या रूपाने सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नका. आपल्यापेक्षा उंच असणाऱ्या प्राण्यांवर बिबट्या सहजासहजी हल्ला करीत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे. व बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी त्वरित संपर्क करावा. असे आवाहन गुंड यांनी यावेळी केले आहे.