अरुण भोई
Daund News दौंड : जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरी लावली होती. यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, जूनमध्ये जिल्ह्यात अवघा १६.९० टक्के पाऊस नोंदविला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण २६.५६ टक्के होते. जून महिना संपल्यानंतर अद्याप ग्रामीण भागात पावसाची म्हणावी तशी हजेरी नाही. (Daund News)
मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर काही तालुक्यांमध्ये पेरणीचा श्रीगणेशा झाला होता. मात्र, मृगाचे नक्षत्र लागूनदेखील नंतरच्या टप्प्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने आता पेरण्या संकटात सापडल्या आहेत. यंदा पावसाने महिनाभर अंदाज चुकविल्याने जिल्ह्यात पेरण्यांसमोरही संकट उभे ठाकले होते. दरम्यान, जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावत पेरणी झालेल्या पिकांना जीवदान दिले आहे. तरीही किमान ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच जमिनीची ओल विचारात घेऊनच पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात २५०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने दौंड तालुक्यांसह राजेगाव, खानवटे, मलठण, स्वामी चिंचोली, खडकी या भागात पावसाने अपेक्षित प्रमाणात हजेरी लावली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या महिन्यात सुमारे ९२.६२ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या १६.७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे भीम नदी पात्रामध्ये ही वाढ नसल्याचे चित्र पाहायला मिळते.