दिनेश सोनवणे
दौंड : दौंड – सिद्धटेक या अष्टविनायक महामार्गवरील नेहरू चौक येथे डेनेज लाईनचा चेंबर रस्त्यावर तुटलेला आहे. सदर चेंबर खराब झाला असून धोकादायक परिस्थितीत आहे. तेव्हा कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्याची दुरुस्ती करावी. अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
नेहरू चौक या ठिकाणी देवीचे मंदिर असून नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने येथील मंदिरात भाविकांची ये जा असते, या महामार्ग वरून दुचाकी, चारचाकी, सायकल, माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या, ट्रक, एसटी तसेच सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक ) कडे जाणाऱ्या मोठ्या बसेस ही याच मार्गावरून जातात. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी खराब झालेल्या चेंबरवर पत्रा, दगड, व काठीला पोते गुंडाळले आहे. जेणेकरून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लांबूनच हे धोकादायक चेंबर दिसावे. व त्यामुळे अपघात टळतील. अशी नागरिकांनी तात्पुरती व्यवस्था केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील नेहरू चौकातच मध्यभागी हा डेनेज लाईनचा चेंबर आहे. हा चेंबर तब्बल १० फूट खोल असून बऱ्याच दिवसांपासून खराब झाला आहे. या चौकात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. यामध्ये चुकून कोणीतरी पडले तर गंभीर जखमी होऊ शकते. अशी गंभीर परिस्थिती आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चेंबर ची दुरवस्था झाल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चेंबर धोकादायक असून तातडीने त्याची दुरुस्ती करावी. आणि धोका टाळावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.