सोलापूर : अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यात भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झालं असून धैर्यशील मोहिते पाटील 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चाना आता पूर्णविराम मिळणार आहे. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. एवढंच नाही तर, संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर हे सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय गणिते पूर्णतः बदलून गेले आहेत.
शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील देखील तुतारी हाती घेणार
शिवसेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देणार आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळणार आहे. शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली.
यावेळी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह माढ्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी करमाळा विधान सभेचे शिवसेनेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ एप्रिल रोजी नारायण आबा पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
करमाळा तालुक्यातून मोहिते पाटलांना मोठं बळ
करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील १३व्या विधानसभेत निवडून आले होते. २०१४ ते २०१९ या काळात ते आमदार होते. नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण पाटील यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याने करमाळा तालुक्यातून मोहिते पाटलांना मोठं बळ मिळू शकतं.
मी गेली दहा वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत : नारायण पाटील
मी गेली दहा वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत आहे. यावेळी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे नारायण पाटील 26 एप्रिल रोजी करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती घेणार असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.