परभणी : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत लागोपाठ तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने जीव वाचवण्यासाठी पळापळ केली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. तिला वाचवण्यात यश आले नाही आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेनंतर मयत मुलीच्या बहिणीने आपल्या भाऊजींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलिक काळे आणि त्याच्या पत्नी मुलींसह वास्तव्यास होते. कुंडलिक काळे यांना त्यांच्या पत्नीपासून सूरूवातीला दोन मुली होत्या. या दोन मुलींच्या पाठोपाठ त्यांच्या बायकोला पुन्हा तिसऱ्यावेळी मुलगीच झाली होती. त्यामुळे कुंडलिक काळे प्रचंड रागावले होते आणि नाराज झाले होते.
याच नाराजीतून आणि रागातून कुंडलिक काळेने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर जळालेल्या अवस्थेत असलेल्या महिलेने स्वत:ला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नव्हते. त्यानंतर एका माणसाने चादरीच्या सहाय्याने तिच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा एक माणूस देखील तिच्या बचावासाठी धावला होता. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ती अर्धी जळून कोळसा झाला होती. या घटनेत तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये मयत मैना काळे हिच्या बहिणीने तक्रार दिली आहे .याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी कुंडलिकला ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.