बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील पिसर्वे, माळिशरस, मावडी- पिंपरी, नायगाव, राजुरी, रिसेपिसे, पांडेश्वर, रोमनवाडी या भागातील वातावरणातील बदलामुळे शेतीतील कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने, शेतकरी चिंता तुर झाला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी महागड्या औषधांची, फवारणी करावी लागत आहे.
चालू वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाची पिके हातातून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. चालू वर्षी वातावरणामध्ये सतत बदल होत असल्याने, शेतकरी चिंता तुर झाला आहे. सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण यामुळे पिकावर विविध रोग पडण्याची शक्यता वाढली आहे.
कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो आदी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. बाजारभावाचा पत्ता नाही. मात्र रासायनिक खते व औषधे यांचा खर्च वाढत असल्याचे विशाल कोलते, माऊली यादव, हनुमंत चौडकर, भाऊसो बोरकर, सतीश गोळे, योगेश मुळीक, माणिक झेडे, यांनी सांगितले.