रायगड: उरण तालुक्यात सोशल मीडियाच्या (Crime News) माध्यमातून तरुणांना प्रेमाच्या (Raigad News) जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक (Uran News) आणि मानसिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून तरुणांशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने किमान 5 तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महिलेचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला सुरुवातीला सोशल मीडियावर मैत्री करून हळूहळू प्रेमाच्या नात्यात गुंतवत असे. विश्वास वाढल्यानंतर ती संबंधित तरुणांना राज्याबाहेरील सहलींवर घेऊन जात असे. या प्रवासादरम्यान भावनिक जवळीक साधून पुढे लग्नाचे आमिष दाखवले जात असे. त्यानंतर तरुणांना उरण येथील घरी बोलावून घेतले जात होते.
उरणमधील घरी एका भटजीच्या मदतीने लग्नाचा देखावा उभा केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या कथित लग्नासाठी पेण तालुक्यातील एकाच भटजीचा वारंवार वापर करण्यात येत असल्याने हे संघटित रॅकेट असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. लग्न झाल्याचा बनाव झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी करत असे.
तरुणांनी पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर गैरकृत्याचे खोटे आरोप करून पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली जात असे. काही प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठीही मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर संबंधित महिला स्वतःच पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेत असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी फसवणूक झालेल्या तरुणांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन करून फोटो, व्हिडिओ आणि संभाषणाचे पुरावे गोळा केले असून ते पोलिसांकडे दिले आहेत. आणखी पीडितांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन तक्रारदारांनी केले आहे. या प्रकरणात पुढील तपासानंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.






