लोणी काळभोर : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक 2 ने फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. ४) संध्याकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत 73 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन गांजा तस्करांना अटक केली आहे . मात्र, याच परिसरात फुरसुंगी पोलीस केवळ गांजाचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यातच गुंतले असल्याचे चित्र समोर आल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वप्निल दयानंद गंधारे (22 ) आणि प्रतिक बाळू गाडे (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 किलो 169 ग्रॅम गांजा, 10 हजार 500 रुपयांची रोकड, 40 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 73 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तुकाई टेकडी परिसरात सापळा रचण्यात आला.

विशेष म्हणजे, गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करून तस्करांना बेड्या ठोकल्या असताना, त्याच दिवशी फुरसुंगी पोलिसांनी तुकाई टेकडी परिसरातून पाच जणांवर केवळ गांजाचे सेवन केल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) व 27 अंतर्गत गुन्हे दाखल केले. या कारवाईत दत्तात्रय सुतार (50), सचिन कपाळे (35), विश्वास शिंदे (21), तौसिफ शेख (22) आणि ज्ञानेश्वर सुतार (19 ) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. गांजाचा मोठा साठा आणि तस्कर गुन्हे शाखेला सापडतात, मात्र स्थानिक फुरसुंगी पोलिसांना फक्त गांजा ओढणारेच सापडतात का? परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीवर स्थानिक पोलिसांची कारवाई का होत नाही, याबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
फुरसुंगी परिसरात अंमली पदार्थांचा वाढता शिरकाव, वारंवार समोर येणाऱ्या कारवाया आणि तरीही स्थानिक स्तरावर तस्करांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने “पेंड कुठेतरी पाणी खात आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थविरोधी कारवाईचा आढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे.






