मुंबई : राज्यात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात. या महाविद्यालयांच्या इमारती, रुग्णालयांची बांधकामे दर्जेदार असावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत. राज्यमंत्री मिसाळ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे, शंकर जाधव, श्वेतांबरी खडे, तुषार पवार आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, शासनाने आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या आरोग्य सेवा रुग्णांना विनासायास उपलब्ध व्हाव्यात. रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वसतीगृहे दर्जेदार असावीत. रुग्णालयाप्रमाणेच वसतिगृहांमध्येही स्वच्छता असावी.
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणांतर्गत सुरू असलेली बांधकामे, साधनसामग्री, नवीन महाविद्यालये बांधकामे प्राप्त निधी, झालेला खर्च याबाबतचा आढावा घेऊन प्राप्त निधी मार्चपूर्वी खर्च करावा, अशा सूचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत.
दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब असून कर्करोग सेवांचे बळकटीकरण करणे महत्वाचे आहे. पुणे येथे सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालयासाठी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी दिल्या. या बैठकीत राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, विद्यार्थी संख्या, नवीन वैद्यकीय महाविद्यालये पदभरती, केंद्र शासन अंतर्गत प्रकल्प, रिक्त पदे भरती प्रक्रिया, देश का प्रकृती परीक्षण अभियान, आयुष संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींचा आढावा घेतला.