नाशिक : अवघ्या काही दिवसांवर मुलाचा विवाह येवून ठेपलेला असताना त्याच्या माता-पित्याने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार शरणपूररोडवरील टिळकवाडी भागात घडला. लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे, आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षा जयेश शहा (५५) व जयेश रसिकलाल शहा (५८, रा. यश कृपा बंगलो, टिळकवाडी शरणपूररोड) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शहा दाम्पत्याने रविवारी (दि. ५) रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या बंगल्यात विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले. मुलाने तत्काळ दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, सोमवारी (दि. ६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
संशयास्पद आढळले नाही; आत्महत्येचे मुढ
सरकारवाडा पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केली असता तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडलेली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही. शहा दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले असून, त्यापैकी एक विवाहित आहे. मोठा मुलगा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, धाकट्याचा २६ जानेवारी रोजी विवाह पार पडणार होता.
मंगल सोहळ्याआधी घडले अमंगल
विवाह सोहळ्यानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. रविवारी (दि. ५) एका धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या संख्येने पाहुण्यांनी हजेरी लावली होती. दिवसभर बंगल्याच्या आवारात जेवणावळ पार पडली. सर्व पाहूणे मंडळी आपआपल्या घरी गेली, मोठा मुलगाही कामानिमित्त घराबाहेर पडला, तर धाकटा जवळच देवदर्शनासाठी गेला होता. काहीवेळात मोठा मुलगा घरी पोहोचल्यानंतर त्याने आईवडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याचे बघितले. कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना दाम्पत्याने अचानक आत्महत्या का केली, यासह या घटनेमागे अन्य काही कारणे आहेत काय, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत.