पुणे : सोसायटीत गाड्या पार्क करण्यावरुन जोरदार वाद झाला. या वादातून चार तरुणांना लोखंडी रॉड, दगड व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत दत्ता अंकुश चोरघे (वय ३३, रा. श्रीपाद हाइट, जांभुळवाडी तलावाजवळ, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी विनायक जगन्नाथ साळुंखे (वय ३०, रा. श्रीपाद हाईट, आंबेगाव खुर्द) सागर अर्जुन साळुंखे (वय २४, रा. अनुसया वाडा, रविवार पेठ) आणि प्रतिक कैलास साळुंखे (वय १९, रा. दांडेकर पुल) यांना अटक केली आहे.
फिर्यादी यांच्यावर धनकवडीतील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. फिर्यादींचा स्कूल बसचा व्यवसाय असून, त्यांच्या दोन गाड्या आहेत. त्यांच्या सोसायटीतील पार्किंगच्या गैरसोयीमुळे सभासदांची बैठक ठेवण्यात आली होती. त्यात सर्वानुमते विनायक साळुंखे यांना त्यांच्या गाड्या बाहेर लावण्यास सांगितले असता त्यांनी सर्वांशी वाद घातला.
दरम्यान, हे कामावर निघाले असताना दुसर्या दिवशी फिर्यादी पार्किंगमध्ये साळुंखे त्यांना भेटला. त्याने फिर्यादी यांना ‘तुला कळत नाही, तू माझा गाववाला असून तू त्यांची बाजू घेतोस का, तुम्हाला बघुन घेतो. तुम्ही माझ्या गाड्या कश्या बाहेर काढता तेच बघतो’, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी ‘तू हे मला कशाला सांगतोस, तू सगळ्यांसमोर मिटिंगमध्ये बोल’, असे म्हणून ते कामाला निघून गेले. त्यानंतर दुपारी कामावरुन घरी परत आले. तेव्हा पार्किंगमध्ये विनायक साळुंखे व त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादी यांना पकडून शिवीगाळ केली. विनायक याने हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण केली.
मारहाणीमुळे फिर्यादी खाली पडले असता इतरांनी दगडाने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर त्यांचा ड्रायव्हर व इतरांनी त्यांच्या तावडीतून सोडविले. फिर्यादी यांच्या डोक्याला, चेहर्याला, खांद्याला, उजवे पायाच्या गुडघ्याला जबर मार लागला. त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यांच्यावर धनकवडीतील सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.