पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने ठेकेदाराच्या डोक्यात कुर्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठेकेदाराच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, तसेच त्याने हातावर वार झेलल्याने दोन्ही हातांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. ही घटना येरवडा येथील जयजवाननगर परिसरातील जय शक्ती मंडळाजवळ सोमवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी रितेश लक्ष्मण परदेशी (वय-४८, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश रमेश वाघमारे (वय-३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी यांचा व्यवसाय ठेकेदारीचा आहे. व्यवसायाकरीता ते दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी वाटेत वाघमारे याने त्यांना अडविले. लफडे करतो काय, मी तुला आज जिवंत सोडणार नाही, तुला संपवतोच. असे म्हणून काही करण्याच्या आत त्याने कुर्हाडीने परदेशी यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान, फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या भागावर कुऱ्हाडीने जबर वार केले. त्यावेळी परदेशी यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने ते दुचाकीसह खाली पडले. त्यानंतर वाघमारे याने कुर्हाडीने त्यांच्यावर अनेक वार केले. त्यांनी त्यांचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही हात मध्ये केले. त्यमुळे कुर्हाडीने दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.