संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल-खंदरमाळ येथे दिंडीत कंटेनर घुसल्याने चार वारकरी ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना ३ डिसेंबरला दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (रा. व्दारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कणकोरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (रा.कोन्हाळे, ता. राहाता) चौघे ठार झाले.
तर बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दसरथ गायकवाड, ओकार नवनाथ चव्हाण, निवृत्ती पुजा डोंगरे, शरद सचिन चापके, अंकुश ज्ञानेश्वर कराळ, मिराबाई मारूती ढमाले हे आठजण गंभीर जखमी झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शिर्डी येथील काशिनाथ महाराज माऊली यांची साईबाबा पालखी सोहळ्यात दीडशे वारकऱ्यांची दिंडी संगमनेरकडून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीच्या दिशेने निघाली होती. रविवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दिंडी पुणे-नाशिक महामार्गावरून घारगावच्या दिशेने जात होती.
एकोणावीस मैलाच्या पाठीमागे आली असता पाठीमागून भरधाव वेगात कंटेनर दिंडीत घुसला. या घटनेत चार वारकरी ठार तर, आठजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पुणे-नाशिक रस्त्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अपर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे घटनस्थळी धाव घेत सर्व वारकऱ्यांना शिर्डीला रवाना केलं.