नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या मतदारसंघात धडाक्यात प्रचार करत असतानाच त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे. याबबत जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर रश्मी बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला होता. परंतु, जात पडताळणी समितीने निर्णय दिल्यानंतर पुढे काय करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
काँग्रेसकडून रश्मी बर्वे या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. मात्र त्यांना ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा पुढे आला आहे. बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात येत आहे. सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने बर्वे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.