पुणे : काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या क्लीन चिटनंतर पुण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी सुरेश कलमाडी यांच्यावरती गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्व संपलं. मात्र तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. सबसे बडा खिलाडी असणाऱ्या सुरेश कलमाडी यांना खोट्या आरोपात गोवण्यात आले, त्यामुळे पुणेकर एका मोठ्या नेतृत्वाला मुकले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता. अखेर त्यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली.त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी यांच्या घरासमोर पेढे वाटप करत घोषणाबाजी देऊन आनंद व्यक्त केला.
कोण आहेत सुरेश कलमाडी?
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. कलमाडी यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९६० मध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला. १९६४ मध्ये सुरेश कलमाडी हवाई दलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जोधपूरमधील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले होते. १९५४ ते १९७२ या सहा वर्षांच्या कालावधीत सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे.