पुणे : आज बेळगाव सीमाभागात ज्या प्रकारे महाराष्ट्रातील गाड्यांवर कन्नड वेदिकांनी हल्ला केला, त्याचा आम्ही निषेध करतो. या कन्नड वेदिकेच्या मागे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला काँग्रेस आणि जेडीएस हे दोन पक्ष आहेत. पुढच्या काळात काँग्रेसला फायदा मिळावा यासाठी अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
आज दुपारी बेळगाव जवळच्या हिरेबागेवाडी येथील टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करताना महाराष्ट्रातील गाडयांना लक्ष्य केले.
यावेळी काही ट्रकवर शाईफेक व दगडफेक करण्यात आली होती. याविषयावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर आरोपीची राळ उठवली आहे.
काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात एक भूमिका मांडत आहे आणि कर्नाटकामध्ये कन्नड वेदिकेला मागून फूस देत आहेत. कन्नड वेदिकांच्या मागून कोण आंदोलन करते आहे? कोण खतपाणी घालते आहे? हे लक्षात घेतलं पाहिजे. याबाबत महाविकास आघाडीनेही भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्च्यावरूनही टीका केली. हा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून काढण्यात येत असल्याचे ते म्हणाले.