पुणे : कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी देण शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या चांगलच अंगलटी आलं आहे. हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. जीवाला हानी पोहोचवत कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी हेमंत पाटील यांनी कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांना दिली होती.
या प्रकरणी कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी हेमंत पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. विनयकुमार आवटे हे कृषी सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे राज्यातील पीकविमा योजनेचे काम आहे. या संदर्भाने विविध स्तरावर शेतकरी, लोकप्रतिनिधी शासनास व व्यक्तिगतरित्या आवटे यांच्याकडे संपर्क करत असतात.
नेमक काय घडलं?
कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिक विमा संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीला हेमंत पाटील, वरिष्ठ शासकीय अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर हेमंत पाटील यांनी आवटे यांना बोलवले आणि कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसमोर धमकी दिली असल्याचे तक्रार अर्जात विनयकुमार आवटे यांनी नमूद केले आहे.
तक्रारीत काय म्हटले?
शासनाच्या अत्यंत महत्वाच्या आणि शेतकऱ्यांशी निगडीत योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान त्या योजनेच्या राज्यस्तरावरील अधिकाऱ्याने त्याला होणारी संभाव्य शारीरिक इजा आणि झालेला मानसिक त्रास याबाबत सांगितले. पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करणे व तंगडी तोडणे वगैरे स्वरुपाची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी आवटे यांनी केली आहे.