पुणे : खाऊ देण्याच्या आमिषाने नराधमाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या राजगुरुनगर येथील दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. लैंगिक अत्याचार, बलात्कार व अॅसिड हल्ल्यातील पीडितांना मनोधैर्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत राज्य सरकारने वाढ केली आहे.
त्यानुसार, आता पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने गुरुवारी सुधारित शासन निर्णय काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेत राजगुरुनगर येथील बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलींच्या कुटुंबांना प्रत्येक दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई घोषित केली.