Pune Crime News : पुणे : कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला असलेल्या कामगाराला बेदम मारहाण करीत, त्याचा निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. पगाराच्या मुद्द्यावरून हा वाद होत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि एका माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश भिडे (वय ३६) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी हा प्रकार घडला होता. गुन्हा घडल्यानंतर अकस्मात मृत्यूचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. चतु:शृंगी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून, हा खून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी कंपनी मालक शेखर महादेव जोगळेकर (वय ५८, रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२), माजी पोलीस आणि राजकीय कार्यकर्ता दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (वय ५३, रा. काकडे पॅलेसमागे, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (वय २९, रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपळे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह आणखी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी रेश्मा अनिल भिडे (वय ३०, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, त्यांचे पती अविनाश भिडे (वय ३६) हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून नोकरी करीत होते. या दोघांमध्ये पगारावरून वाद होत होते. यापूर्वीही शेखर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करून मारहाण करून ऑफिसमधून हाकलून दिले होते. घटनेच्या दिवशी देखील त्यांनी आपसात संगनमत करून अविनाश यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव जानकर करीत आहेत.