लोणी काळभोर, (पुणे) : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील मयूर मित्र मंडळाच्या वतीने डीजे व ढोल-ताशांचा गजर विरहित चाललेल्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. पारंपारिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या सहाय्याने विविध प्रकारचे पावले खेळत मिरवणुकीला आषाढी वारीचा रंग आणत गणेश विसर्जन करण्यात आले अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष करण वाल्हेकर व उपाध्यक्ष निलेश क्षीरसागर यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावा नंतर दोन वर्षांनी जल्लोषात सर्वच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विसर्जनासाठी ढोल पथक, मोठमोठे डी.जे लावण्यात आले परंतु या सर्वांना फाटा देत मयूर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आषाढी वारी ही संकल्पना राबविली. यासाठी देवाची आळंदी येथील अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष हभप चेतन महाराज शास्त्री यांचे सहकार्य लाभले. मानाच्या पालखीमधून श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने विविध प्रकारचे पावले खेळत मिरवणुकीला आषाढी वारीचा रंग आणला. गावातील महिला, तरुण,वृध्द वर्गाने या वारीत फुगड्या खेळून आनंद लुटला व आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला.