लोणी काळभोर : मेणबत्तीने पेट घेऊन घराला आग लागल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात गुरुवारी (ता. 3) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच, सुट्टीवर असतानाही कर्तव्याची जाणीव ठेवून बाबासाहेब चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलेली आग विझवून कर्तव्य पार पाडले. त्यामुळे ते खरे हिरो ठरले आहेत. चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबासाहेब भागवत चव्हाण (वय-43, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आग विझविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाचे नाव आहे. तर नितीन जमाले (वय-40, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आग लागलेल्या सदनिका मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जमाले हे एक ट्रकचालक आहेत. त्यांचा कवडी माळवाडी परिसरातील मुळेकर वस्तीजवळ दत्त पार्क इमातारीमध्ये फ्लॅट आहे. त्यांची फ्लॅट हा भाडेतत्वावर दीपक दिगंबर पतंगे (वय-25) यांना दिला होता. पतंगे हे एक प्लंबर असून ते कुटुंबासोबत या फ्लॅट मध्ये काही महिन्यांपासून राहत आहेत.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कदमवाकवस्ती परिसरात जोरदार हजेरी लागली होती. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. घरात प्रकाश व्हावा म्हणून पतंगे यांनी घरात मेणबत्ती लावली होती. मात्र या मेणबत्तीने अचानक पेट घेतल्याने घराला आग लागली होती.
या घटनेची माहिती मिळताच, बाबासाहेब चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाकातोंडाला रुमाल बांधला. व सदनिकेमध्ये भरलेली गॅसची टाकी सर्वात प्रथम बाहेर काढली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले. यासाठी बाबासाहेब चव्हाण यांना अक्षय मुळेकर, विकी घाडगे, विनोद मुळेकर यांचे सहकार्य मिळाले. या आगीत घरातील फर्निचर, बेड, कपडे, फ्रीज, वायरिंग, फॅन असे सुमारे 50 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जवान बाबासाहेब चव्हाण यांचे होतंय कौतुक
आगीची माहिती मिळताच, सुट्टी असतानाही कर्तव्याप्रती बाबासाहेब चव्हाण त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना धीर दिला. सुरक्षेची कोणतीही साधने नसतानाही घरात प्रवेश केला आणि आग विझविण्यात यश मिळवून खूप मोठी दुर्घटना टळली. यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कर्त्याव्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणारे अग्निशामक जवान बाबासाहेब चव्हाण यांचे कौतुक होत आहे.
कर्तव्य बजावून घरी आलो होतो. घरी आराम करत असताना, अचानक अक्षय मुळेकर या तरुणाने या आगीची माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालो. प्रसंगावधान दाखवून घरात शिरलो. नागरिकांच्या मदतीने आग विझविली. घरामधील गॅस सिलिंडर बाहेर काढून दिला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.असे बाबासाहेब चव्हाण (फायरमन – हडपसर अग्निशामक दल) यांनी सांगितले