राहुलकुमार अवचट
पुणे : आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल, असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक हा सोहळा यशस्वी करावा. यात्रेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यक तो औषधांचा साठा, ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवावा. १०२ व १०८ सेवेच्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. पाणी स्रोतांच्या ठिकाणी तसेच टँकरच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करावी तसेच निर्जंतुकीकरण करावे.
खासगी रुग्णालयातील खाटाही आरक्षित करुन ठेवाव्यात, अशाही सूचना दिल्या असून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या जवळ, दिंड्यांलगत फिरती शौचालये ठेऊन त्याठिकाणी पाणी, विजेची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची नेमणूक करावी.
महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वीज पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत राहील. तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही. याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात. दिंड्यांना गॅसचा पुरवठा तसेच केरोसीन पुरवठ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमित धुरळणी करावी.
पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश त्वरीत निर्गमीत करावेत. पीएमपीएमएल व एसटीने पुरेशा प्रमाणात बसेसची व्यवस्था ठेवावी. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पथके तसेच आवश्यक संख्येने बोटी तैनात ठेवाव्यात.
आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्नीशमन वाहने सतर्क ठेवावीत, आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नदीमध्ये सध्या असलेले अस्वच्छ पाणी वाहून जावे यासाठी यात्रेस प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस अगोदरपासून वडिवळे धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असेही डॉ. देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
उपविभागीय अधिकारी कट्यारे यांनी यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती सादर केली असून, गतवर्षीपेक्षा अधिक संख्येने एकूण ४०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या यात्रेसाठी येणारी भाविक संख्या मोठ्या प्रमाणात लगतच्या ग्रामीण भागात मुक्काम करत असल्याने त्या ठिकाणी देखील पाणी, स्वच्छता, वीज आदींबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीस पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागांचे अधिकारी यांच्यासह वारकरी महामंडळचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.