पुणे: शहरात गारठा वाढत असून शुक्रवारी (दि. ३) किमान तापमानात २ अंशांनी घट झाली असून, पारा ११.७ अंशांवर घसरला आहे. तर, एनडीए येथे थंडीचा पारा ११.१ अंश सेल्सिअस इतका होता. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सकाळी हवेतील गारवा काही प्रमाणात वाढलेला दिसत असला तरी दुपारी उन्हाचा चटका कायम दिसत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला असल्यामुळे तसेच हवामान कोरडे झाल्यामुळे थंडी वाढू लागली आहे. गेले काही दिवस शहरात किमान तापमानात घट होत आहे. सायंकाळनंतर थंड वारे वाहत असून पहाटे गारठा जाणवत आहे. उपनगरांत काही भागात थंडीत वाढ होत आहे. पाषाण येथे किमान तापमान १२.२, कोरेगाव पार्क १६.५, वडगाव शेरी १८.६ तर मगरपट्टा येथे १८.६ अंश सेल्सिअस तापमान होते.