मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यात महायुतीनं बाजी मारल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे…?
“राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही लोकांनी लोकांच्या हातात घेतलेली निवडणूक होती. लोकांनी आमच्यावर मतांचा प्रेमाचा वर्षाव केला. आम्ही राज्यात जे काम केलं, जे निर्णय आम्ही घेतले ते आत्तापर्यंतच्या इतिहासात न भूतो न भविष्य आहेत. मविआचे कामावरील स्टे आम्ही काढले, विविध विकास कामं आम्ही केली, आम्ही विकासाला प्राधान्य दिलं. राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलं. कल्याणकारी योजना आम्ही आणल्या. लाडकी बहीण योजनेवर करण्यात आलेल्या आरोपांना आम्ही सामोरे गेलो. हे देणारं सरकार आहे. फक्त बोलणारं सरकार नाही यावर लोकांनी विश्वास ठेवला. सीएम म्हणजे कॉमन मॅन हा आमचा नारा असून आमची नियत साफ आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झालं आहे”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसंच लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, असंही ते म्हणाले.
कल्याणकारी योजना राबविल्या. यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, युवा प्रशिक्षण, तीन गॅसलाईनची योजना दिली. शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी 45 हजार कोटी रुपये दिले. या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, हेच आमचं ध्येय होतं. मोदी साहेब आणि केंद्र सरकार आमच्या बाजूने ताकदीने उभे राहिले. आमचे प्रस्ताव मान्य केले. दोन अडीच वर्षात आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. डबल इंजिनचं वेगवाग आणि गतिमान सरकार आहे, असंही शिंदे म्हणाले.