पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी हा सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून आतापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बाळू शंकर अहिरे, (वय 55) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय 50). मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.