उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात गुरुवारी (ता. ०४) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो घरामध्ये पाणी शिरल्याने घरात पाणी पाणी झाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. चालू हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चुकीच्या नियोजनातून केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. तुपे वस्ती, साखरे पंप ते रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी झालेल्या पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. तसेच डाळींब रोड मुकाई वस्ती या ठिकाणावरील ड्रेनेजचे अनियोजीत काम झाल्यामुळे रोडच्या जवळ असलेल्या नाकरीकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
मागील काही दिवसापासून उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरु आहेत. मात्र रस्त्याची कामे करीत असताना त्या ठिकाणी असलेल्या जुन्या घरांच्या उंचीचा विचार न करता रस्त्याची उंची वाढवल्याने तसेच त्या भागात असलेल्या जून्या गटार लाईन तुंबल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात जाण्याने त्यांच्या घरातील फर्निचर, कपडे व अन्य घरगुती वापराच्या चांगल्या किमतीच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांनी केलेल्या कामाच्या अनास्थेमुळे व कामे करताना केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
तुपे वस्ती, मुकाई वस्ती येथील अनेक नागरिकांच्या संसाराची धूळधाण झाली आहे. त्यांना योग्य ती मदत मिळाली पाहिजे व चुकीच्या नियोजनातून करण्यात आलेल्या कामांना जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी या नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारचा पाऊस झाला होता त्यावेळी या ठिकाणी ड्रेनेजचे काम करून देऊ असे आश्वसन दिले होते. मात्र ते काम अद्यापपर्यंत झाले नाही. तसेच उरूळी कांचनचे सरपंच व सदस्य यांना वारंवार डाळींब रोड येथील मुकाई वस्ती येथील ड्रेनेज चे कामाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे अक्षय कांचन व प्रताप कांचन यांनी सांगितले.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले असले तरी, घरे व दुकानांच्या नुकसानीस मानवनिर्मित असल्याचे दिसून येत आहे. शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरलेल्या ओढ्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ०४) झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याच्या लगत हाहाकार माजवल्याचे दिसून आले आहे. डाळींब व शिंदवने गावातून आलेल्या व उरुळी कांचन शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या दोन्ही ओढ्यांची अवस्था छोट्या गटाराहून अधिक वाईट असल्याचे दिसून येत आहे.