लोणी काळभोर : किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात लाकडी दंडुक्यासह लाथा-बुक्क्यांनी हणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती येथील इराणी गल्लीत बुधवारी (ता. ६) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी मुनस अय्युब ईराणी (वय ४०, धंदा गृहिणी, रा. गट नं. २७६, इराणी गल्ली, पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मजलुम हाजी सय्यद, मरीयम मजलूम सय्यद, गुलामराजा मजलूम सय्यद व मेहंदीहसन मजलूम सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रीयम मजलूम सय्यद (वय ४३, धंदा गृहिणी, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयुब मंजुर इराणी (वय-४५) व अली आयुब इराणी (वय २०, दोघेही रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनस ईराणी राहत असलेल्या घरामध्ये येऊन आरोपींनी त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी गुलामराजा याने त्याच्या हातामधील बेझबॉलचे लाकडी दांडके फिर्यादी यांचे पती अय्युब यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला तसेच हातावर मारुन दुखापत केली आहे.
दुसऱ्या घटनेत, रीयम सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रीयम सय्यद या घराशेजारी असलेल्या गटारीजवळ शिल्लक राहीलेले अन्न टाकण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा आरोपी आयुब इराणी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांच्या डोक्यामधून रक्तस्त्राव झाला आहे. तसेच आरोपी अली इराणी याने फिर्यादी यांचे पती मजलूम याला हाताने मारहाण केली.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबातील ६ जणांविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.